वृद्धशिक्षा परिचय
डॉ. रा. ल जोशी निवृत्त प्राध्यापक संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर

हा एक प्रकरण ग्रंथ असून वेदान्तातील सर्व विषय अत्यंत सूक्ष्म रूपाने यांत आलेले आहेत. या ग्रंथाचे महत्त्व प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामींनी प. प. दीक्षितस्वामींना लिहिलेल्या एका पत्रावरून कळून येते. ‘...... जशी नामस्मरणाकरीता स्मरणी तशी उपनिषत्-सूत्र स्मरणार्थ ही (वृद्धशिक्षा) स्मरणी जाणावी. तुम्ही स्वतः वृद्धशिक्षा समयाप्रमाणे पहावी व पहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्रणवोपासना ठेवावी. प्रणवाभ्यासाकडे चित्तवृत्ति ठेवल्याने चित्त शांत होईल ....... प्रणवोपासनाच तारील.’ अशाप्रकारे साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा वृद्धशिक्षेच्या पहिल्या श्लोकात, चित्तस्थैर्याकरीता प्रणवोपासना सांगून, साधनचतुष्ट्यसंपन्न नसलेल्या परंतु भगवद्भक्त असलेल्या, मंदवैराग्ययुक्त संन्याशाला सुद्धा ज्ञानप्राप्ति होते हा विशेष सिद्धान्त सांगितला आहे. श्रवणमननादिकांची लक्षणे, षड्विधतात्पर्यलक्षणे, प्रयोजन, महत्त्व, तत्त्वपदार्थविवेचन, महावाक्यार्थ-निरूपण, दशोपनिषत्तात्पर्य, जीवन्मुक्ताचा आचार प्रतिपादन करणारे दत्तमाहात्म्यादि ग्रंथाचे साररूप दत्तचरित्र यात आले असून, त्यामुळे उपनिषदे व ब्रह्मसूत्रे यांची उजळणी करणारा वृद्धशिक्षा हा ग्रंथ असल्याचे स्वामींनी यथार्थच म्हटले आहे.

$काराने सगुण व निर्गुण अशा उभयविध दत्तस्वरूपाचा बोध होतो. तो दत्तपरमात्मा आपले रक्षण करो असे मंगल स्तवन करून ग्रंथाला प्रारंभ केला आहे. या दत्तपरमात्म्याचा आश्रय केल्याने साधन-चतुष्ट्य-संपत्ति नसली तरी सुद्धा सर्वस्वाचा त्याग करून शरण आलेल्या भक्ताला दत्तस्वरूपप्राप्ति म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो. तीव्र वैराग्य नसले तरी एकवेळ चालेल. मन्दवैराग्य व तीव्र भक्तिभाव असलेला संन्यासी परमपद प्राप्त करून घेऊ शकतो असे भक्तीचे माहात्म्य प्रतिपादन केले आहे. याकरीता एका गोष्टीची मात्र आवश्यकता आहे. अशा संन्यासाने भिक्षाटन, भगवंताचे नामस्मरण, स्नान, बाह्य व आन्तरिक शुद्धि, देवपूजा व ध्यान ही सहा कर्मे आवश्यक म्हणून केली पाहिजेत त्याचप्रमाणे मञ्चकं शुक्लवस्त्रं च स्त्रीकथा लौल्यमेव च। दिवास्वापश्च यानं च यतीनां पतनानि षट्।। म्हणजे पलंग, शुभ्र वस्त्र, स्त्रियांविषयी चर्चा, इंद्रियांचे लाड पुरवणे, दिवसा झोपणे व वाहन ही संन्याश्याच्या अधःपतनाला निमित्त असणारी सहा कारणे आहेत. शास्त्रनिन्द्य असलेल्या या सहा कर्मांचा त्याग मुमुक्षूने केलाच पाहिजे. भक्तीचे माहात्म्य अगदी सहजगत्या मंगलश्लोकातच सांगितले आहे. जन्मतःच मनुष्याला प्राप्त होणाऱ्या देवऋण, ऋषिऋण व पितृऋण या तीन ऋणांतून मुक्त झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हा सामान्य नियम दत्तभक्त असलेल्या संन्याश्याला लागू नाही असा सिद्धान्त अधिकारवाणीने श्रीस्वामीमहाराजांनी सांगितला आहे. जीव हा कर्ता नसतानाही कर्ता वाटतो, तो भोक्ता असल्याचेही आपल्याला अनुभवाला येते, तसेच आत्मे अनेक आहेत असेही व्यवहारात दिसते. परंतु हा सर्व अनुभव परमार्थतः बरोबर नाही. केवळ उपाधिमुळे म्हणजे दुसऱ्या पदार्थाशी झालेल्या दृढ संबंधामुळे तसा प्रत्यय येत असतो. जसे आकाश हे एकच असताना घट, मठ इत्यादि पदार्थांच्या संबंधामुळे ते भिन्न भासते, त्याप्रमाणेच विज्ञानमय कोशाशी म्हणजे बुद्धीशी एकरूप झाल्यामुळे आत्मा हा कर्ता भासतो, तर आनंदमय कोशाशी एकरूप झाल्यामुळे तो भोक्ता भासतो. जास्वंदीचा लालपणा ज्याप्रमाणे त्याच्या जवळ ठेवलेल्या स्फटिकावर भासतो त्याचप्रमाणे देहादिक उपाधींच्यामुळे आत्मा त्या त्या कर्तृत्वादिगुणांनी युक्त भासतो. हे सर्व जग अनित्य आहे असा दृढ निश्चय करून, कितीही प्रिय वाटला तरी प्रवृत्तिमार्ग सोडून शिष्योद्धार करण्यास समर्थ अशा ब्रह्मनिष्ठगुरुंचा आश्रय घेतला पाहिजे. शब्दब्रह्मांत म्हणजे पुस्तकी ज्ञानात ते गुरु निष्णात असून दृष्टान्तद्वारा पटवून देण्याचे कौशल्य त्यांच्याजवळ असले पाहिजे. त्याचबरोबर ज्ञानाची अनुभूति-अनुभवात्मक ज्ञानही, त्यांच्यापाशी असले पाहिजे. अशाप्रकारच्या गुरुंच्या ठिकाणी आत्यंतिक श्रद्धा, म्हणजे तो प्रत्यक्ष परमेश्वरच आहे अशी भावना असली पाहिजे. अशा भावनेने त्यांच्या मार्गदर्शनाने श्रवण, मनन, निदिध्यासन करावे. शिष्याच्या ठिकाणी श्रद्धालुत्व, आत्यंतिक निष्ठा, जितेन्द्रियत्व हे गुण असले पाहिजेत. सामान्यपणे ज्ञानाच्या बाबतीत असे म्हटले जाते की, शाब्द-ज्ञानाचा काही उपयोग नाही, अपरोक्ष साक्षात्काररूप ज्ञानाचीच आवश्यकता आहे. याविषयी इथे मुद्दाम असे स्पष्ट सांगितले आहे की, परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्द ज्ञान, ते त्याज्य नाही. गुरुमुखाने केलेल्या वेदान्त श्रवणाने ज्ञान-प्रतिबंधक असलेले पाप नाहीसे होते. बुद्धिपूर्वक केलेले पातक सुद्धा नाश पावते. केवळ परोक्ष ज्ञानाने सुद्धा आत्मा देहाहून भिन्न आहे का नाही, अशाप्रकारचे संशय नाहीसे होतात. परोक्ष ज्ञानाचे हे महत्त्व नाकारता येणार नाही. (या ज्ञानाने अहंकार उत्पन्न होतो असे म्हणतात व व्यवहारात तसे अनेक ठिकाणी दिसूनही येते. अर्थात् हा दोष परोक्ष ज्ञानाचा नसून त्या त्या व्यक्तीचा असतो.) या परोक्ष ज्ञानाचे साधन असलेले श्रवणादिक मुमुक्षूने अवश्य करावे, असे सांगितले आहे. या शाब्द-ज्ञानानंतरच अपरोक्ष साक्षात्काररूप ज्ञान होत असून त्या अपरोक्ष साक्षात्काररूप ज्ञानाने शोक-मोहादिक व कोणत्याही प्रकारचा संशय शिल्लक राहात नाही. या ज्ञानाचे स्वरूप असे आहे की, जीव आणि ब्रह्म वेगळे नसून एकच आहेत व या अवस्थेत दृश्य जगत् परमात्म-स्वरूपच असल्याचा अनुभव येतो. जीव व परमात्मा किंवा ईश्वर यांच्यात भेद असल्याचे श्रुतीत सुद्धा काही ठिकाणी सांगितलेले आढळून येते. अशा परिस्थितीत द्वैत रूपाने म्हणजे भिन्नत्वाने केलेला जीव व आत्मा यांचा उल्लेख खरा, का त्यांचा अभेद-रूपाने केलेला श्रुतीतील उल्लेख खरा असा संशय उत्पन्न होतो. त्याचे निराकरण असे केले आहे की, भेद हा उपाधिमुळे होत असतो. त्याला व्यावहारिकसत्ता म्हणजे अस्तित्व आहे, पारमार्थिक सत्यत्व नाही. भेद प्रतिपादनाने काहीही फल प्राप्त होत नाही. अभेद प्रतिपादनाने मात्र मोक्षरूपी फल सांगितले असल्यामुळे ‘फलवत्संनिधौ अफलं तदंगम्।’ या न्यायाने सर्व श्रुतींचे तात्पर्य अभेद प्रतिपादनातच मानणे योग्य आहे. अपक्रम-उपसंहार, अभ्यास, फल, अर्थवाद व उपपत्ति या सहा प्रमाणांनी सर्व वेदान्त वाक्यांचे तात्पर्य एकमेवद्वितीय ब्रह्म-प्रतिपादनातच मानणे योग्य आहे, असे छांदोग्योपनिषदातील श्वेतकेतूला त्याच्या पित्याने केलेल्या उपदेशावरून स्पष्ट होते. अशा प्रकारचा तात्पर्य-निश्चय म्हणजेच श्रवण. या श्रवणाने बुद्धि सुसंस्कृत झाली म्हणजे तिच्यामुळे अपरोक्ष म्हणजे अनुभवात्मक किंवा साक्षात्काररूप ज्ञान उत्पन्न होत असते. बुद्धीने त्या परमात्म्याचे ज्ञान होऊ शकत नाही असे जे अनेक ठिकाणी म्हटले आहे त्याचा अर्थ इतकाच की, श्रवणाचे संस्कार नसलेल्या बुद्धीने आत्म्याचे ज्ञान होऊ शकत नाही. किंवा अधिक शास्त्रीय परिभाषेत मांडावयाचे झाल्यास, असे म्हणता येईल की, वाणीने किंवा मनाने आत्मतत्त्व जाणले जात नाही असा जो निषेध केला आहे, तो निषेध ‘फलव्याप्तीचा’ असतो म्हणजे तो आत्मा चिदाभासाने प्रकाशित होत नाही, या अर्थाने केला आहे. म्हणूनच ‘दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या’ म्हणजे सूक्ष्म किंवा श्रवण-संस्कारयुक्त बुद्धीने या आत्मतत्त्वाचे ज्ञान होते, असेही इतरत्र म्हटले आहे. त्या ठिकाणी वृत्तिविषयत्व म्हणजे अज्ञानाचे आवरण घालविण्याकरीता तदाकार-वृत्तीचा ते (ज्ञान) विषय होते, असे सांगितले आहे. असे स्पष्टीकरण केल्याने ‘दृश्यते’ व ‘न दृश्यते’ या विधानांचा विरोध उत्पन्न होत नाही.

एकमेवाद्वितीय ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे, असे म्हटल्यावर जग हे ‘सत्’, ‘असत्’ किंवा ‘सदसत्’ असे मानताच येणार नाही. जगाचे हे तीन प्रकारचे स्वरूप तीन निरनिराळ्या शास्त्रकारांनी मानले असून त्यांनी एकमेकांचे खण्डन केले आहे. त्यामुळे हे अनिर्वचनीय म्हणजे सत्, असत् किंवा सदसत् या शब्दांनी ज्याचे निर्वचन करता येत नाही अशा प्रकारचे आहे, असे अद्वैत-मतच सिद्ध होते.

ईश्वराच्या अपेक्षित सर्वगुणसंपन्न भक्ताला गुरुने महावाक्यांचा उपदेश एकदा जरी केला तरी तो स्वतःच्या यथार्थ स्वरूपाचा, सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव घेऊ शकतो. त्याला जर काही प्रतिबंध असतील तर त्या प्रमाणात कमी-अधिक वेळाही उपदेश करावा लागतो. जीव हा जागृत, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे. म्हणूनच तो त्यांच्यापासून भिन्नच आहे. त्याचप्रमाणे घट-पटादिक पदार्थाहून त्यांना प्रकाशित करणारा दिवा जसा भिन्न असतो त्याप्रमाणे स्थूलदेहादि दृश्य पदार्थाहून, प्राण, इन्द्रिये, मन, बुद्धि, अहंकार यांच्याहून त्यांना प्रकाशित करणारा जीव भिन्न असून तो स्वयंप्रकाशी आहे. देहादिकांशी जीवाचा जो संबंध आलेला दिसतो तो आध्यासिक म्हणजे कल्पित होय. मूलतः तो निर्विकार कूटस्थ असा आहे.

जगातील कोणतीही वस्तु आपल्याला जी प्रिय होत असते, तिचे कारण म्हणजे ती आत्म्याला प्रिय होते. कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी निरपेक्ष, निरुपाधिक प्रेम नसते. आत्म्याला ती अनुकूल असल्यामुळेच तिच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होत असते. आत्महत्या करणारा मनुष्य सुद्धा तो देह आत्म्याला प्रतिकूल असल्यामुळे त्याचा त्याग करीत असतो. अशाप्रकारे निरपेक्ष प्रेमाचा विषय असलेले आत्मस्वरूप हे जीवाचे म्हणजे ‘तत्त्वमसि’ या महावाक्यातील ‘त्वं’ पदार्थाचे वास्तविक स्वरूप आहे. जीवाचे वास्तविक स्वरूप परमात्मा हेच असून तो परमात्मा निर्गुण असला तरी शून्यरूप नाही. सजतीय, विजातीय व स्वगत भेदरहित असा तो आहे. म्हणजे त्याच्याहून वेगळे काहीच नसल्यामुळे कोणताही भेद त्याच्या ठिकाणी संभवत नाही. भूक तहान इत्यादि कोणताच धर्म नसलेले, पंचमहाभूतांहून व त्यांच्या कार्याहून पूर्णपणे विलक्षण, ज्याचे कोणी कारण नाही व जे कोणाचे वास्तविक कारण नाही, असे सच्चिदानंदघनरूप परमात्मतत्त्व हा त्या महावाक्यातील ‘तत्’ पदाचा अर्थ आहे. तत्वमसि या महावाक्यातील ‘तत्-पद’ व ‘त्वं-पद’ यांचा संबंध ‘अखंड-तादात्म्य’ अशा प्रकारचा आहे. सामान्यपणे व्यवहारात अनुभवाला येत असलेला संसर्ग किंवा विशिष्ट असा वाक्यार्थ या ठिकाणी होत नाही. संसर्ग म्हणजे वाक्यातील पदार्थाचा संबंध हा काही ठिकाणी वाक्यार्थ असतो. उदा. नील-कमल या ठिकाणी नीलवर्ण व कमळ यांचा संबंध वक्त्याला अभिप्रेत असतो. क्वचित् एका पदार्थाने विशिष्ट दुसरा पदार्थ हा वाक्यार्थ असतो. उदा. नील कमल याच ठिकाणी नीलवर्णाने युक्त कमल असा एक पदार्थ- विशिष्ट दुसरा पदार्थ, असा वाक्यार्थ अभिप्रेत असतो. तसा संसर्ग किंवा विशिष्ट असा वाक्यार्थ या महावाक्याच्या बाबतीत होत नाही.

‘तत्त्वमसि’ या महावाक्यात ‘त्वं’ शब्दाचा वाच्यार्थ म्हणजे अन्तःकरणाशी तादात्म्य पावलेला अल्पज्ञ, अल्पशक्तिमान असा जीवात्मा व ‘तत्’ पदाचा वाच्यार्थ सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असा ईश्वर हा आहे. या दोन वाच्यार्थांचा विरोध असला, तरी दोन्ही पदांचा लक्ष्यार्थ ‘शुद्धचैतन्य’ एवढाच असल्याने त्यांचे ऐक्य होण्यात कोणताही विरोध नाही. वाच्यार्थातील विरुद्ध असणारा भाग सोडणे व काही घेणे (न सोडणे) अशाप्रकारची जहदजहल्लक्षणा स्वीकारून दोन्ही पदांचे किंवा तत्-त्वं पदांचे ऐक्य सिद्ध होते. या महावाक्यांच्या श्रवणाने अधिकारी मुमुक्षूला ब्रह्मसाक्षात्कार झाला म्हणजे तो कृतकृत्य होतो. कृतकृत्य किंवा कृतार्थ होतो याचा अर्थ जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांचा व सर्व बाह्य विषयांचा त्याग करून स्वरूपानंदातच निमग्न होऊन राहतो, विशुद्ध ज्ञानस्वरूप अशा आत्मरूपानेच राहतो तो खरा कृतार्थ. त्याला स्वार्थ असा काहीच नसल्यामुळे केवळ दयार्द्रबुद्धीने परोपकाराकरीता त्याचे जीवन असते.

जगाच्या उत्पत्तिविषयी नैयायिकांचा आरंभवाद व सांख्यांचा परिणामवाद हे मुख्यतः दोन सिद्धान्त आहेत. नैयायिकांच्या आरंभवादात दोन अवयवांच्या संयोगापासून, त्या दोहोहून वेगळा असा तिसराच पदार्थ निर्माण होत असतो. उदा. तंतु-संयोगापासून पट. सांख्यांच्या परिणामवादात मृत्तिकेचा परिणाम होऊन घट होत असतो. यापैकी आरंभवादात संयोगासाठी दोन सत्य वस्तूंची आवश्यकता असते. वेदान्तमतात अद्वितीय असे एकच एक आत्मतत्त्व असल्याने या सिद्धान्ताचा स्वीकार करता येत नाही. परिणामवादातही परिणाम पावणारी वस्तु ही सावयव, विकारी व जड अशी असते. आत्मा तर निर्विकार, निरवयव, चेतन आहे त्यामुळे आत्म्यापासून जगाची उत्पत्ती, परिणामवादाप्रमाणेही होऊ शकत नाही. यासाठी विवर्तवादाचा अंगीकार करून मायायुक्त ब्रह्मापासून जग निर्माण होते, असे श्रुतीतील ऊर्णनाभि म्हणजे कोळी-किड्यांच्या दृष्टान्तावरून अद्वैत वेदान्त्यांनी मानले आहे.

तात्पर्यनिर्णायक षड्विध-लिंगाचे छांदोग्योपनिषदाच्या सहाव्या प्रपाठकावरून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केले आहे.

१) उपक्रमोपसंहार – आत्म्यापासून जगाची उत्पत्ति, त्याच्यातच स्थिति व लय होत असतो असे आत्मतत्त्व एकमेवाद्वितीय आहे, असा प्रारंभ करून शेवटही ‘यतो वा इमानि ....’ या श्रुतीने केला आहे. २) अभ्यास – पुनः पुनः तेच सांगून ‘श्रवण केलेला अर्थ मनात दृढ करणे .... स आत्मा तत्त्वमसि हे श्वेतकेतो।’ असे पुनः पुनः सांगितले. ३) अपूर्वता – जीवब्रह्मैक्य विषयक सिद्धान्त श्रुतिशिवाय इतर कोणत्याही प्रमाणांनी समजू शकत नाही त्यामुळे अपूर्वता हे लिंग उत्पन्न होते. ४) फल – आत्मतत्त्वाचा यथार्थ ज्ञानाने अज्ञान व अज्ञानजन्य शोक-मोह यांचा नाश व आत्यन्तिक आनन्द असे फल हे चौथे प्रमाण. ५) अर्थवाद – आत्म्यापासून उत्पत्ति, स्थिति, प्रलय व आत्म्याचा सृष्टीत प्रवेश आणि आत्म्याने केलेले सृष्टीचे नियंत्रण अशा पाच प्रकारचा अर्थवाद हे पाचवे तात्पर्य-निर्णायक प्रमाण होय. ६) उपपत्ति – जे जे म्हणून दृश्य आहे, ते ते सर्व मिथ्या आहे. इंद्रियांचा विषय नसलेले सत् तत्त्वच फक्त खरे आहे. अशाप्रकारचा विचार म्हणजे उपपत्ति हे सहावे प्रमाण होय.
या सहा प्रमाणांनी अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी सर्व वेदान्तवाक्यांचे तात्पर्य आहे असा निर्णय करणे याला श्रवण असे म्हणतात. या श्रवणाने सर्व संशय नाहीसे होतात. युक्तिपूर्वक केलेले चिंतन म्हणजे मनन. त्या मननाने, अल्पज्ञ जीव सर्वज्ञ कसा होऊ शकेल, अशा कल्पनांचा निरास होतो. चित्ताला स्थिर करण्याने ‘अहं ब्रह्मास्मि’ या अनुभवाच्या आड येणाऱ्या देहात्म्यैक्य अनुभवाचा बाध होऊन सतत ब्रह्माकार वृत्तीच अनुवृत्त होत असते. यालाच निदिध्यासन असे म्हणतात. यामुळे सविकल्प समाधि सिद्ध होते. ही अवस्था एकदा प्राप्त झाल्यावर, समाधि उतरल्यावरही साधकाची आत्मनिष्ठा जात नाही.

ज्ञानाचे मुख्य साधन असलेले हे श्रवणादिक ज्याला जमत नाही त्या मुमुक्षूने निरंतर भगवान् दत्तात्रेयांचे भजन करावे. ते त्याला कृतार्थ केल्याशिवाय राहणार नाहीत. ईशादि दशोपनिषदांमध्ये व स्मृतींतही तसेच दत्तस्वरूप परमात्मत्त्वाचेच वर्णन केलेले आहे. ही समाधि अवस्था एकदा प्राप्त झाल्यावर ती नाहीशी करण्यास कोणीही समर्थ होत नाही. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी अष्टांग योग उपयोगी पडतो. परंतु अष्टांग योगाने प्राप्त झालेली ही आनंदावस्था समाधि कालातच असते. समाधि उतरल्यावर म्हणजे व्युत्थान दशेत राहत नाही. श्रवणादिकाने प्राप्त झालेल्या ज्ञानाने उत्पन्न झालेल्या समाध्यवस्थेतील निरतिशय आनंद कधीही नाहीसा होणारा नसतो. आपल्या भक्तांना संतोष देणारा व त्यांचे सर्व अनर्थ नाहीसे करणारा प्रभु दत्तात्रेय सर्व उपनिषदांप्रमाणेच स्मृतींनीही प्रतिपादन केला आहे. भजन, पूजन आदि न करता केवळ स्मरणाने संतुष्ट होणारी अशी कोणती अन्य देवता आहे? या दत्तात्रेयांनीच सकाम भक्ति करणाऱ्या आयुराजाला सुद्धा त्याची कामना पूर्ण करूनमोक्षही प्राप्त करून दिला. प्रह्लाद, मदालसापुत्र अलर्क, विष्णुदत्त-ब्राह्मण, पिङ्गलनाग, कार्तवीर्यार्जुन, साध्यदेव, दलादन ऋषि, रेणुका यांना निरनिराळ्या प्रकारे उपदेश करून श्रीदत्तात्रेयांनी त्यांचा उद्धार केला आहे. अत्यंत दूर राहूनही केवळ स्मरणाने संतुष्ट होणाऱ्या प्रभू दत्तात्रेयांची लोकोपकारक चरित्रे शेवटच्या दहा श्लोकात वर्णन करून वृद्धशिक्षा समाप्त केली आहे.

शिक्षात्रयम् | कुमारशिक्षा परिचय | युवशिक्षा परिचय
Top