| युवशिक्षा परिचय |
| डॉ. रा. ल. जोशी निवृत्त प्राध्यापक, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर |
|
कुमारशिक्षेत सांगितलेल्या साधनांचे अनुष्ठान केलेल्या साधकाला उपासनामार्गाचा उपदेश करण्यासाठी ही युवशिक्षा लिहिली आहे. कुमारशिक्षेप्रमाणे युवशिक्षेचाही प्रारंभ, श्रीदत्तात्रेय गुरुंना वंदन करूनच केला आहे. वंदनरूप असलेल्या मंगल श्लोकात श्रीदत्तात्रेय हे धर्माचे रक्षण करणारे, भक्त कैवारी, सर्व पातकांचा नाश करणारे, जितेंद्रिय व अतिशय शान्ति-संपन्न असल्याचे वर्णन केले आहे. आपणही आपल्या पातकांचा नाश होऊन आपला उद्धार होण्यासाठी, श्रीदत्तात्रेयांचा आश्रय केला पाहिजे. आपलाही कैवार श्रीदत्तात्रेयांनी घ्यावा अशी इच्छा असेल तर आपणही खरे भक्त झाले पाहिजे, अशा प्रकारचा उपदेश या मंगलश्लोकात केला आहे. दत्तात्रेयांच्यासारखी शांति प्राप्त करून घ्यावयाची असेल तर जितेंद्रिय व्हावेच लागेल, हेही यातून शिकता येते. श्रीदत्तात्रेय हे भक्तपक्षपात का करतात याचे उत्तर असे की, त्यांचा अवतार धर्मरक्षणासाठी असल्यामुळे धर्माचरण करणाऱ्या भक्तांची बाजू घेणे अपरिहार्यच ठरते. भक्ताची चित्तशुद्धी करून त्याला ते ज्ञान देत असल्यामुळे त्याचे ‘सुशिक्ष’ असे या श्लोकात वर्णन केले आहे. ‘अशा प्रकारच्या दत्तात्रेयांचे मी भजन करतो’ असे म्हणून श्रीस्वामीमहाराजांनी या ‘युवशिक्षा’ ग्रंथाचा विषय भजन म्हणजेच उपासना आहे, हेही सूचित केले आहे. या उपासनेचे पर्यवसान ईश्वर-प्रसादात व्हावयाचे असल्याने हे प्रयोजनही सांगितल्यासारखे होते. भगवंताचे भजन किंवा त्याची उपासना करण्यासाठी त्याचे स्वरूप सांगून तो फलदाता असल्याचे वर्णन केले आहे. तो जगताच्या उत्पत्ति-स्थिति-लयाला कारण आहे. मात्र तो नित्य असल्याने त्याचे कोणीही कारण नाही. तो फलदाता आहे, परंतु प्रत्येक जीवाच्या कर्माला अनुसरूनच फल देतो, स्वतंत्रपणे नाही. त्यामुळे त्याला वैषम्य व नैर्घृण्य हे दोष येत नाहीत. अन्यथा कोणाला सुखी व कोणाला दुःखी करीत असल्यामुळे विषमतेचा दोष व सृष्टीचा संहार करीत असल्यामुळे निर्घृणतेचा दोष त्याच्यावर आला असता. याचाच अर्थ तो फल देणारा आहे, पण फल देण्याच्या बाबतीत तो स्वतंत्र नसून, जीवाच्या कर्मावर अवलंबून आहे. ईश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्यांना तर अगदी सहज पटू शकेल अशा स्पष्ट व रोकड्या शब्दात श्रीस्वामींनी असे सांगितले आहे की, आपल्याला प्राप्त होणारी सुखदुःखे आपल्या आधीन नसतात पण आपल्याला प्राप्त होतात, त्या अर्थी ती सुख-दुःखे देणारा ईश्वर मान्य करणे भाग आहे. तो नाही हे म्हणणे म्हणजे आपली आई वंध्या आहे, असे म्हणण्यासारखे आहे. त्या ईश्वराच्या कृपाप्रसादानेच मनुष्य मुक्त होऊ शकतो. हा कृपाप्रसाद प्राप्त होण्यासाठी शास्त्र-विहित कर्माचे आचरण करणे आवश्यक असते, जोपर्यंत देहाच्या ठिकाणी ‘अहंबुद्धि’ असते तोपर्यंत कर्माचरण सोडणे योग्य नाहीच तर ते आवश्यकही आहे. या शास्त्रविहित नित्य कर्मामुळे दोष-परिहार होत असल्याने ती सोडण्याचा अविचार करू नये. शास्त्र-विहित कर्माचरणामुळे ईश्वर संतुष्ट होतो. फलासक्ति व कर्तृत्व-अहंकार सोडून केलेले कर्म, चित्तशुद्धिद्वारा मोक्षालाही कारण होत असते. असा कर्माचा दुहेरी उपयोग होत असल्याचे ब्रह्मसूत्रभाष्याच्या आधारे स्वामींनी प्रतिपादन केले आहे. वेद ईश्वरकर्तृक असूनही पौरुषेय नाहीत असे सुस्पष्ट विवेचन केले आहे. ईश्वराने वेद हे स्वतंत्ररीत्या रचलेले नसून श्वासाप्रमाणे अनायासे उत्पन्न झाले असल्याने अपौरुषेय आहेत, असे म्हणता येते. या वेदांचे स्वरूप व इतर प्रमाणांपेक्षा त्यांचे श्रेष्ठत्व कसे आहे याचेही विवेचन केले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांची लक्षणे व वेदातील विधींच्या अर्थाविषयीचा मतभेद, यांविषयीचा विचार युवशिक्षेत केला आहे. तो समजण्यासाठी पूर्व-मीमांसा-शास्त्राचे अध्ययन आवश्यक आहे. पूज्य श्रीस्वामीमहाराजांच्या कालामध्ये सामान्यपणे सर्व शास्त्रांचे प्राथमिक ज्ञान युवावस्थेत होत असल्याने या शिक्षेत त्यातील सिद्धान्त अगदी थोडक्यात सांगितले आहेत. हे विवेचन आपल्याला कळण्यासारखे नाही, म्हणून आपण ते कशाकरीता वाचावे असा विचार आपण करू नये. श्रीमहाराजांचे ग्रंथ मंत्रात्मक असून ते अदृष्टोत्पत्तिद्वारा आपले कल्याणच करतील, असा दृढ विश्वास ठेवून आपण ते वाचावेत. आपल्याला इष्टप्राप्ति झाल्याशिवाय राहणार नाही. या नंतर वेदांचे प्रयोजन कोणते असा विचार केला आहे. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे यज्ञाकरीता उपयोगी आहेत. यज्ञातील ‘होता’ हा ऋग्वेदी, ‘अध्वर्यु’ हा यजुर्वेदी आणि ‘उद्गाता’ सामवेदी असतो. अथर्ववेदाचा उपयोग यज्ञात नसला तरी शांतिकर्म, पुष्टिकर्म इत्यादि कर्मात त्याचा उपयोग होतो. वेदांतवाक्ये ही परमात्म्याचे ज्ञान करून देण्याच्या बाबतीत ‘स्वतःप्रमाण’ आहेत, म्हणजेच त्यांचे प्रामाण्य दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. ही वेदान्तवाक्ये अनुष्ठान-पद्धती सांगत नसल्यामुळे विधिरूप नाहीत व दुसऱ्या कशाचेही अंग नसल्यामुळे अर्थवाद-रूपही नाहीत. ‘न समजलेला पदार्थ समजून देणे’ अशा प्रकारचे प्रामाण्य वेदान्तवाक्यांना आहे. इतर म्हणजे प्रत्यक्षादि प्रमाणांनी वेदान्त-वाक्यरूप शब्द-प्रमाणाचा बोध होऊ शकत नाही. त्रिकालाबाधित आत्मतत्त्वाचा बोध हा फक्त वेदान-प्रमाणानेच होत असतो, इतर कोणत्याही प्रमाणाने तो होत नसल्यामुळे वेदान्ताला तात्त्विक-प्रमाण असे म्हणतात. म्हणून त्याचा बोध इतर प्रमाणांनी होत नाही. वेदान्तामध्ये निरनिराळ्या अधिकाऱ्यांना उद्देशून निरनिराळ्या उपासना सांगितल्या आहेत. सद्योमुक्ति व क्रममुक्ति असे मुक्तीचे दोन प्रकार असून सद्योमुक्तिकरीता निर्गुण-उपासना व क्रममुक्तीसाठी सगुम उपासना सांगितली आहे. निर्गुण उपासनेचा अधिक विचार वृद्ध-शिक्षेत केला आहे. वैराग्य नसलेल्या मनुष्याने काम्य परंतु श्रुत्युक्त उपासना करण्यास हरकत नाही. वाम मार्गातील उपासना मात्र कधीही करू नयेत. कारण त्यांचा आदर, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा यापैकी कोणीही केलेला नाही. शिवाय वाममार्गातील उपासनांमध्ये सांगितलेले सुरा-मद्य इ. ते सेवन शिष्टसंमत तर नाहीच, उलट त्यासाठी देहान्त प्रायश्चित्त सांगितले आहे. त्यामुळे ब्राह्मणाने या मार्गांचा मुळीच आश्रय करू नये असे स्वामीमहाराजांनी कळकळीने सांगितले आहे. या नंतर ८६व्या श्लोकापासून स्वामीमहाराजांनी मूर्ति-पूजेसंबंधी विस्ताराने विवेचन केले आहे. ईश्वराच्या प्रतिमेची उपासना पूर्वमीमांसा किंवा उत्तरमीमांसा यांमध्ये सांगितलेली नाही. परंतु स्मृतिग्रंथात व पुराणग्रंथात ती मानलेली आहे. त्याचप्रमाणे वेदानुसारी सदाचा-संपन्न अशा शिष्टांनीही मूर्ति-उपासनेचा स्वीकार केलेला आहे. इतकेच नव्हे तर या मूर्ति-उपासनेमुळे ऐहिक उत्कर्ष व पारलौकिक सिद्धि प्राप्त होते असा अनुभवही येतो. या सर्व कारणांमुळे मूर्ति-पूजा किंवा उपासना ही वेदोक्त नसूनही ग्राह्य आहे. ईश्वर मुळात निराकार असूनही तो उपासकाच्या तपश्चर्येमुळे, अर्चनेमुळे व प्रतिमेशी असलेल्या स्वतःच्या तंतोतंत सादृश्यामुळे आणि त्यामुळेच उत्पन्न झालेल्या सौंदर्यामुळे मूर्तीमध्ये राहतो. ही मूर्ति-पूजा विशेषेकरून मंदबुद्धीच्या लोकांसाठी सांगितलेली आहे. ही सगुणोपासना उपासकाचे चित्त शुद्ध करून त्याला जितेन्द्रिय बनविते व ईश्वरानुग्रहामुळे त्याला निर्गुण साक्षात्कार होतो. वस्तुतः मोक्षप्राप्तीसाठी साधनचतुष्ट्यातील वैराग्य हे तीव्र असले पाहिजे अशी अपेक्ष आहे. परंतु स्वामीमहाराज इथे असे सांगतात की, मंद वैराग्य असले तरी परमेश्वराला अनन्य शरण जाऊन त्याचे पूजन केल्यास भगवान संतुष्ट होऊन ज्ञानप्राप्तिद्वारा त्याला मोक्ष देतो. या सर्व कारणांमुळे, प्रतिमापूजा त्याज्य आहे, हे मत सर्वथा अयोग्य आहे. देवतेला शरीर आहे ही गोष्ट वेदप्रामाण्यावरून सिद्ध होते. श्री समर्थ रामदास्वामींनी भगवान रामचंद्रांच्या प्रतिमेची उपासना करून अपरोक्ष साक्षात्काररूप मोक्ष प्राप्त करून घेतला असल्याचे सर्वांना ज्ञात आहेच. मूर्तिपूजेच्या प्रामाण्यासाठी श्रीसमर्थांचा दाखला दिल्यानंतर, मूर्तिपूजा ही कशी सफल आहे हे दाखविण्यासाठी, श्रीनारायणस्वामींचे चरित्र शेवटच्या बारा श्लोकात (८९-१००) संक्षेपाने सांगितले आहे. त्याचा सारांश असा – विधुरावस्थेत असलेले श्रीनारायणस्वामी आपल्या दोन मुलींना बरोबर घेऊन कर्नाटकातून नृसिंहवाडीस आले आणि सतत श्रीदत्तगुरुंचे चिन्तन पूजन करू लागले. निरंतर केलेल्या चिंतन-स्मरणामुळे श्रीदत्तगुरु प्रसन्न झाले व त्यामुळे श्रीनारायणस्वामींना समाधिसिद्धी प्राप्त झाली. एकदा श्रीनारायणस्वामींनी रात्री आपल्या मुलींना पेज पाजवून निजविले व स्वतः समाधि अवस्थेत राहिले. त्या लहान मुली पहाटे शौचास उठल्या असता श्रीदत्तगुरुंनी श्रीनारायणस्वामींचे रूप घेऊन, त्यांना दिवा दाखवून, स्वच्छ करून स्वामींची समाधि उतरेपर्यंत त्यांचे रक्षण करण्याचे काम केले. श्रीनारायणस्वामींना हे वृत्त समाधीतून उठल्यावर समजले. ते सद्गदित झाले. या घटनेमुळे त्यांना तीव्र वैराग्य प्राप्त झाले. मुलींची लग्ने करून ते पूर्णपणे संसारापासून विरक्त झाले. आपल्याला संन्यासाश्रम मिळावा अशी श्रीदत्तप्रभूंकडे ते अनन्यभावे सतत प्रार्थना करू लागले. त्याचा योग्य तो परिणाम होऊन श्रीदत्तप्रभूंनी त्यांना प्रैष व दण्ड देऊन स्वतः संन्यास दिला. एवढी मोठी योग्यता केवळ मूर्तिपूजनाने श्रीनारायणस्वामींना प्राप्त झाली. अशा प्रकारे श्रीसमर्थ यांच्यासारखी उदाहरणे असल्यामुळे कोणीही मूर्तिपूजा निरर्थक किंवा अशास्त्रीय मानू नये, असे प्रतिपादन श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराजांनी युवशिक्षेच्या शेवटी केले आहे. अशा प्रकारे ही युवशिक्षा अत्यंत मननीय व अभ्यसनीय झाली आहे. |

